बीड, 19 जून : 7 लाखांचा हुंडा घेऊन साखरपुडा केला, मात्र लग्न दुसऱ्या मुलीसोबत केल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. सुशिक्षित लोक देखील हुंडाच्या अनिष्ट रुडीला खत पाणी घालत असल्याचं यानिमित्ताने पुन्हा समोर आलं आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत फसवणूक करणाऱ्या व डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तुमच्या मुलीसोबत लग्न करतो, मला लातूरला हॉस्पिटल सुरू करण्यासाठी 7 लाख रुपये द्या, असे म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्याने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली. साखरपुडा झाला, हुंडा दिल्यानंतर त्याने परस्पर दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याच्या आरोपावरून त्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परळी शहरातील सोमेश्वर नगरमधील डॉ. संदीप वसंतराव मंत्रे असे त्या फसवणूक करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. तो सध्या लातूर जिल्ह्यातील साकोळ ता शिरूर अनंतपाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, गेल्या वर्षी 18 सप्टेंबर रोजी संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो अशी त्याने मागणी घातली. मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले. हे ही वाचा-
अल्पवयीन मुलीनं मित्राच्या मदतीनं लांबवलं 16 तोळे सोनं; फिल्मी स्टाईलनं अटक
23 सप्टेंबर रोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. 21 ऑक्टोबर रोजी मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि 5 मे रोजी लग्न करण्याचे ठरले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले. मात्र, 23 मार्चपासून संदीपने त्याचा मोबाईल बंद केला. अखेर 4 एप्रिल रोजी संदीपचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाल्याचे व्हाॅट्सॲपवर व्हिडीओ क्लिपमध्ये सांगून या लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉ. संदीप मंत्रे याच्यावर परळी शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. केवळ लग्नास नकार देऊन संदीप शांत बसला नाही. माझे लग्न झाल्याचे सांगूनही माझा पाठलाग करण्यात येत आहे, लग्नासाठी माझ्या कुटुंबावर दबाव आणत आहेत, अशा आरोपांचा व्हिडीओ करून तो नातेवाईकात पाठवून मुलीची आणि तिच्या वडिलांची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संदीपने हुंडा घेतलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना अंधारात ठेऊन दहा वर्षापासून ओळख असलेल्या मुलीसोबत लातूर जिल्ह्यातील रायवाडी येथील मंदिरात लग्न केले. याच मुलीसोबत लग्न करण्याचे निश्चित असतानाही संदीपने माझ्या मुलीसोबत विवाह करतो म्हणून सात लाख रुपये घेऊन फसवणूक केली असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link